कृषी प्रशिक्षक – सारीका मसलकर

नमस्कार मी सारिका दत्ता मसलकर राहणार हरंगुळ खुर्द तालुका जिल्हा लातूर. 
माझं लहानपण एका गरीब कुटुंबात झाल. आई गावातील लोकांच्या शेतात मजुरी करत असे आणि वडील दुसऱ्याच्या कापड दुकानात नोकरी करत असे. अशा परिस्थितीत माझे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आणि लागलीच लग्नही पार पडले.

मी शाळेत खूप हुशार विद्यार्थिनी होते पण गरिबीमुळे मी पुढचे शिक्षण घेऊ शकले नाही आणि त्यामुळे मला दहावीपर्यंतच टप्पा गाठता आला. माझे लग्न 15 मे 1992 ला झाले. त्यावेळी जेमतेम मी पंधरा ते सोळा वर्षाची असेल. संसार काय असतो, त्याची पूर्ण समज मला नव्हती पण सासरकडील सर्व माणसे खूप चांगली होती.

लग्न झाल्यानंतर पाच ते सहा महिन्यांनी मी पुढचे शिक्षण घेण्यासाठी माझ्या पतिला विचारले आणि काहीही विचार न करता त्यांनी मला होकार दिला. मी खूप आनंदी झाले पण एक अडचण समोर होती की सासू-सासर्‍यांची परवानगी कशी घ्यायची एक दिवस दुपारचे जेवण करीत असताना मी सासूबाईला माझी इच्छा बोलून दाखवली. सासूबाई मला म्हणाल्या की मी तुझ्या सासऱ्यांना विचारून पाहते तू काही काळजी करू नको आणी अशा रीतीने मला सासू-सासर्‍यांची परवानगी मिळाली. सासरकडून शिक्षणाची परवानगी मिळाल्यानंतर मी या गोष्टी माहेरच्या लोकांना सांगितल्या. दुसऱ्या दिवशी माझ्या मोठ्या भावाने शाळेतून माझी टी सी काढली व रेणापूर मधील एका महाविद्यालयात ऍडमिशन घेतले. काही दिवस गेल्यानंतर सासरे म्हटले की तू रोज कॉलेजला जाऊ नको कारण मला लातूर ते रेनापुर हा प्रवास खूप लांबचा पडत होता. मग मी घरी बसूनच 11 वी ते 12 वी हा शिक्षण प्रवास पूर्ण केला आणि काही कारणास्तव माझे पुढचे शिक्षण थांबले.

पण मला लहानपणापासून शिक्षणाची आवड असल्याने मी घरी बसून शिकवणी घेण्याचे ठरवले आणि मुले पण चांगली जमायला लागली. हे करीत असतानाच मला एक संधी मिळाली शिकवणी घेत घेत तुम्ही पोस्टाच्या आरडी चे काम करा, महिलांना बचतीचे महत्व समजावून सांगा, कारण एक महिलाच दुसऱ्या महिलेशी चांगला संवाद साधू शकते. मग मी हे काम हाती घेतले .

मला दोन मुले झाली मुले मोठी होत होती तसे त्यांच्या शिक्षणाचा खर्चही वाढत होता. गावातील शिक्षण पद्धती व्यवस्थित नसल्यामुळे मी माझ्या मुलांना शहरात शिकवण्याचा पुढाकार घेतला. आणि त्यांचे शिक्षण हरंगुळ पासून सहा ते सात किलोमीटरवर असलेल्या लातूर शहरात सुरू केला. हरंगुळ ते लातूर दूर असल्याने मुलांना स्पेशल ऑटो लावावा लागला. खर्च वाढत होता पण उत्पन्न किंवा कमाई म्हणा त्यामध्ये वाढ होत नव्हती. मग माझ्या डोक्यात एक विचार आला की आरडी एजंट मुळे व शिकवणी घेण्यामुळे गावात माझ्या चांगल्या ओळखी निर्माण झाल्या होत्या याचा फायदा मला होणार हे मला माहीत होते. म्हणून मी व्यवसाय करण्याचे ठरविले, ही पण इच्छा मी पतीला बोलून दाखवली त्यांनी मला इथे पण साथ दिली आणि आम्ही किराणा दुकानाचा व्यवसाय सुरू केला. माझे पती पूर्वी दुसऱ्याच्या किराणा दुकानात काम करत होते त्यामुळे त्यांना त्यांच्यातील माहिती होती या गोष्टीचा फायदा आम्हाला खूप झाला. कोणत्या वस्तू कुठे स्वस्त दरात व एक नंबर मिळतात हे माझ्या पतिला माहित होत्या या कारणाने ग्राहकांचा प्रतिसाद सुद्धा वाढला. दुकान चांगले चालायला लागले सात ते आठ वर्षे दुकान चांगले चालले पण नंतर ग्राहक थोडे कमी झाले कारण लातूर हे शहर जवळ असल्यामुळे व गावात पण दुकाने जास्त झाल्यामुळे व्यवसाय कमी चालायला लागला.

मग मला काय करावे हे समजेना कारण मुलांना उच्च शिक्षण पण घ्यायचे होते व त्यासाठी पैशाची गरज होती मग मी परत काहीतरी करण्याचे ठरवले आणि एक दिवस मी गावातील एका मैत्रिणीकडे गेले असता ती मैत्रीण मला विणकाम करताना दिसली मला विणकाम हे आधीच येत होते पण त्याकडे मी कधी व्यवसाय म्हणून पाहिले नाही व माझ्या डोक्यात एक कल्पना आली की मी पण विणकाम व्यवसाय सुरू करू शकते त्यानंतर मी विणकामाच्या वस्तू बनवून गावातील काही मैत्रिणींकडे ज्यांच्याकडे अगोदरच काहीतरी व्यवसाय आहेत त्यांच्या दुकानी मी माझ्या वस्तु तयार करून देऊ लागले व हा व्यवसाय सुरू झाला.

हे करीत असतानाच गावामध्ये *स्वयं शिक्षण प्रयोग* या संस्थेचे काही अधिकारी आले आणि त्यांनी माझ्या घराशेजारील महिलेला कृषी सखी हे काम करण्यास तयार केले .शेजारील महिलेसोबत मी पण कधीकधी स्वयं शिक्षण प्रयोग ऑफिस ला लातूर मध्ये जाऊ लागले यावेळी मी एक व्यवसायिक महिला म्हणून तिथे ट्रेनिंग घेण्यासाठी जात असे. बघता बघता एक ते दोन वर्षे पूर्ण झाली यादरम्यान मला तेथील संस्था अधिकाऱ्यांकडून कृषी विषयक ट्रेनिंग देण्यासाठी *”ट्रेनर”* या पदाची ऑफर आली आणि मी ती स्वीकार केली. गेली एक वर्ष मी या पदावरती ट्रेनर म्हणून काम करत आहे. आज पर्यंत या संस्थेत मला खूप चांगले अनुभव अनुभवायला मिळाले. माझे उत्पन्नाचे साधन वाढले आणि आर्थिक समस्येचा ताणही कमी होत गेला.

अडचणी येतात जातात पण त्यावर जर सातत्याने मात करत राहिलो तर जीवनात अशक्य काहीच नसते, यावर विजय कसा मिळवायचा हे आपल्याच हाती असते. सतत सकारात्मक विचार केला तर नकारात्मक गोष्टीचा आपल्या जीवनावर काहीही परिणाम होत नाही हेच मला या कहाणी द्वारे सांगायला आवडेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *