‘दिव्यांग ज्ञानेश्वरीची धडपड’, धडधाकटासाठी प्रेरणादायी।।

‘दिव्यांग ज्ञानेश्वरीची धडपड’, धडधाकटासाठी प्रेरणादायी।।
बरीच माणसे आपल्याकडे सगळ्या सुखसोई असताना ही रडगाणे गात समस्येचा पाडा वाचुन दाखवत असतात. परंतू काही माणसे आपल्याकडे काही नसतानाही जीवन हे रडगाणे नाही, तर ते एक गाणे आहे. ते जीवन गाणे आनंदाने गात असतात. जे जे आपल्याजवळ आहे. त्यांचा उपयोग घेत असतात म्हणुनच मंगेश पाडगावकर म्हणतात.
सांग तुला कस, जगायचंय
कण्हत कण्हत ही गाण म्हणतं
पेला आहे अर्धा भरलेला
पेला आहे आधी सरलेला.
सरलेला म्हणणार की, भरलेला
हे आता तु ठरवायचंय!

शेवटी जगणे सुखकर करण्यांसाठी आपला सकारात्मक दृष्टीकोन महत्त्वाचा आहे. हाच जगण्यांतील सकारात्मक दृष्टीकोन ठेवुन औसा तालुक्यातील तुंगी येथील दिव्यांग ज्ञानेश्वरी सुधाकर कदम यांची धडपड सुरू आहे.

ज्ञानेश्वरी सुधाकर कदम यांचे गाव औसा तालुक्यातील तुंगी हे आहे. 29 वय वर्ष असलेल्या ज्ञानेश्वरी ह्या जन्मताच डाव्या पायाने अपंग आहेत. 12 वी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या ज्ञानेश्वरी यांचा विवाह सुधाकर कदम यांच्याशी झाला. सुधाकर यांना मामा नसल्याने आजीने प्रभावती माने (आईची आई) त्यांचे पालकत्व स्विकारले आहे. सुधाकर हे लहानपणापासुन आजी सोबत राहु लागले. आजीने त्यांना 3 एकर जमीन दिली आहे. शेती व्यवसाय करुन कष्टाळु सुधाकर लातूर येथे हमाली करतात व आपल्या प्रपंचाला हातभार लावत असतात. ज्ञानेश्वरी या एका पायाने अपंग असल्याने शेतीतील काम करणे     त्यांना शक्य नव्हते. ज्ञानेश्वरी यांचे शिक्षण 12 वी पर्यंत रेणापुर येथील श्रीराम विद्यालयात झाले आहे. त्यांना 9 वर्षाचा मुलगा व 7 वर्षाची मुलगी आहे. पुढे त्यांनी जगदंबा शेतकरी महिला बचत गटाची स्थापना केली व गटाच्या त्या अध्यक्षा झाल्या.

स्वंयशिक्षण संस्थेच्या सुपरवायझर सुमित्रा जाधव व संवाद सहाय्यक मनिषा श्रीहरी सुर्यवंशी यांनी ज्ञानेश्वरी यांना स्वंयशिक्षण प्रयोग संस्थेचे सेंद्रीय शेती व व्यवसाय बाबतचे प्रशिक्षण घेण्याचा सल्ला दिला. व त्यांनी औसा येथे जावुन त्यांनी सेंद्रीय शेती तथा व्यवसायाचे 10 दिवसाचे प्रशिक्षण घेतले. त्या प्रशिक्षणात त्यांना मनशक्ती, जागृती, व्यापार हे सांगुन व्यवसाय करण्यासाठी व यशस्वी जिवनासाठी डोक्यावर बर्फाचा खडा, पायात भिंगरी आणि तोंडात साखर ही त्रिसुत्री सांगितली गेली. तसेच उत्पादन, किंमत, जागा, प्रचार, लोक आणि प्रतिक्रिया याबाबत त्यांना मार्गदर्शन केले व प्रशिक्षणांतुन अात्मविश्वास  वाढल्यांने ज्ञानेश्वरी यांनी व्यवसाय करण्याचे ठरविले.

ज्ञानेश्वरी यांना शिवणकाम ही कला अवगत असल्याने त्यांनी सुरूवातीला शिवणकाम करण्यास सुरूवात केली. त्या उत्तमपणे ब्लाऊज, ड्रेस, परकर शिवतात त्यातुन त्या साधारणपणे प्रतिदिन 150 ते 200 रुपये  कमावतात. पतीकडुन 250 घेवुन त्यांनी एक गावरान कोंबडी खरेदी केली आता त्यांच्याकडे 10 अंडे देणा­र्‍या कोंबड्या आहेत तर 10  लहान कोंबड्या त्यांनी नुकत्याच खरेदी केल्या आहेत. 


सेंद्रीय शेतीला केली सुरूवात
मागील खरीप हंगामापासुन त्यांनी सेंद्रीय शेतीस सुरूवात केली आहे. उत्पादन खर्चात बचत करुन त्यांनी दर्जेदार उत्पादनाची निर्मिती केली आहे. अर्धा किलो सुर्यफुलाची त्यांनी पेरणी केली होती. त्यांना 12 कट्टे सुर्यफुल निघाले आहे. त्या स्वत: पिकविलेल्या सेंद्रीय सुर्यफुलाचे तेल त्या घरी खाण्यासाठी वापरतात. 1 एकर मध्ये मुग, भुईमुग, सुर्यफुल, मका वांगे, टमाटे, उडीद, हिरवी मिरची, गावरान भेंडी, तीळ, गावरान चवळी, तुर आदी पिके त्यांनी मिश्र पिक पध्दतीचा अवलंब करुन घेतली आहेत.1 किलो मुगापासुन 150 किलो मुग उत्पादन करण्यांचा विक्रम ही त्यांनी केला आहे. 

सेंद्रीय शेती करण्यासाठी त्यांनी दोन गावरान गाई विकत घेतल्या. 20 रुपये प्रति लिटर प्रमाणे त्या गाईच्या गोमुत्राची विक्री त्या करतात.लिंबोळी, धोत्रा, सिताफळ, पपई, रुचीक, गाजर गवत, गजगा, कारंजी, एरंडी, निरगुडी, गोमुत्र यापासुन त्या दशपर्णी  अर्क बनवितात. गुळ, बेसनपिठ, शेण, गोमुत्र यापासुन त्या जीवामृत बनवितात व त्याचा वापर पिकांच्या निरोगी वाढीसाठी होत असल्याचे त्या सांगतात.

ल.मी.त. औषधांची निर्मिती
लसुन,हिरवी मिरची व तंबाखु यापासुन त्या औषध तयार करतात व त्याची फवारणी करतात. हे औषध म्हणजे कोराजीन या रासायनिक औषधा पेक्षाही भारी असल्याचे त्या सांगतात. कसलीही पिकावरील किडीचे नियंत्रण या औषधाने होते अशा त्या आत्मविश्वासाने सांगतात. भविष्यात उत्तमपणे सेंद्रीय शेती करुन कुकूटपालन व्यवसाय करण्यांचा त्यांचा मानस आहे. अतिशय शांत, संयमी असलेल्या ज्ञानेश्वरी या प्रामाणिक पणे सांगतात की, हे सर्व मी स्वंयशिक्षण प्रयोग संस्थेमुळे करु शकले असे त्या विनम्रपणे  सांगतात. त्यांच्या भावी आयुष्यास मन:पुर्वक शुभेच्छा..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *