३ हजार कोटीची मालकीन – कल्पना सरोज

३ हजार कोटीची मालकीन – कल्पना सरोज

भारतीय उद्योग जगतातील अति यशस्वी उद्योजीका व समाजसेवी

जीवन एक संघर्ष

मोठा संघर्ष, त्याचे फळः मी ज्या समाजात जन्मले तीथे मुलींना जास्त शिकवले जात नाही. पोलिस हवालदाराची मुलगी. सातवी पर्यंत कशीबशी शिकले. मग लवकर लग्न झालं. मुलींचे लग्नानंतरचे स्वप्न असते, सासर चांगले मिळाले पाहिजे. तेही माझ्या नशिबात नव्हते. लग्नाच्या ६ महिन्यानंतर माझे बाबा मझ्या सासरी आले. प्रत्येक्ष परिस्थिती पाहुन आपली मुलगी या घरात दिल्याचा त्यांना पश्चताप झाला. त्यांनी निर्णय घेतला. मला माहेरी घेऊन आले. माहेरी आल्यानंतर नातेवाईक व मित्र संबंधी बाबांना म्हणत होते की लग्न झालेल्या मुलीला अस माहेरी किती दिवस ठेऊन घेणार हे काही बरोबर नाही. या सर्वांच्या नजरेत एकच होतं की मी मोठी गुन्हेगार आहे. सासर सोडुन आलेली आहे. मीच चूका केलेल्या असतील. असा त्यांचा समज होता.

आत्महत्तेचा असफल प्रयत्न

मला सुध्दा हे सर्व असह्य झालं. शिक्षण अपुर्ण, लग्न व संसारही अर्धवट, हे सर्व माझ्या काळजीत वाढ करणारे होते. हे सर्व सहन करत बसण्यापेक्षा मेलेलं बरं असं ठरऊन मी विष पिले. शेजारी-पाजा-यांनी मला दवाखान्यात नेल. वाचवायचा खुप प्रयत्न करुन वाचवलं.

दवाखान्यात मला बघायला आलेल्या अनेकांनी मला प्रश्न केला काय पोरी तु काय केलंस हे. जर कदाचित तु मेली असतीस तर लोकांनी काय म्हणलं असतं की महादुच्या पोरीनं नक्कीच काहीतरी चूक केली म्हणून ती मेली. मी माझ्या दुःखांना कंटाळुन ठरवले की स्वतःला संपवायचे. आत्महत्तेचा प्रयत्नही केला. तो विफळ गेला.

मी जगले,जगायचे ठरवले, जगवायचे ठरवले

मी जगले. मग जगायचे ठरवले. तेव्हा काही तरी करावं म्हणन मी अकोल्यात त्यावेळी पहिल्यांदा महिला पोलिस भरती होती. तीथं गेले. मी थेट सर्कल साहेबांना भेटले, विनंती केली की मला पोलिसात घ्या. त्यांनी मला समजाऊन सांगीतलं की बेटा तु अजुन लहान आहेस. आधी एसएससी पास हो मग तुला आपण पीएसआय बनऊ. समजुत काढुन त्यांनी परत पाठवलं.

मग विचार केला नर्स तरी व्हावं.प्रयत्न केले तेही होता आलं नाही. कारण वय व शिक्षण दोन्ही कमी असल्याने असं होत होतं.

शिवणकाम शिकण्याची तयारी

मग ठरवलं आपण शिवणकाम शिकावं. एक ब्लाऊज शिवले तर १० रुपये मिळतात. दिवसात ३-४ ब्लाऊज शिवले तर रोजचे ३०-४० रुपये कमावले तर महिन्याचे एक हजार कमावता येतील. बाबांची पगार त्याकाळी ३०० रुपये होती.नोकरीच्या पेक्षा शिवणकामाचा व्यवसाय करुन महिना एक हजार कमाई करेन. शिवणकाम शिकले. पण ब्लाऊज तितके चांगले शिवता येत नव्हते. मग दिवसाला ३-४ ब्लाऊज शिवण्याचे स्वप्नच राहिले.

मुंबई गाठली

मग मी माझ्या आईला सांगीतलं की मला आता मुंबईला जाऊदे. तीथं खुप कंपन्या आहेत.मला नक्की काहीतरी नोकरी करता येईल. मला असं ओझं होनं आवडत नाही.कुठं कामही मिळत नाही. बाबांच्या एकढया जबाबदा-या आहेत. दुसरे बहीन-भाऊ आहेत. आजोबा आहेत. काका आहेत. त्यांना ३०० रुपये पगार आहे. पुन्हा त्यात माझंही ओझं झालं. लग्न होईपर्यंतच मुलगी आपली असते, लग्नानंतर ती परकी अशी भावना त्या काळी असायची. माहित नाही त्या काळी अशा भावना का होती ते. बाबांना आईनं सांगीतलं बाबा म्हणाले मुंबईत तर दिलं होतं. तरुण मुलगी अशी एकटी मुंबईत कशी पाठवायची. आईनं समजावलं इथे राहुन मरायचा प्रयत्न करते. मुंबईला जाऊन कशी तरी जगेल इथे रेल्वेखाली जीव देण्यापेक्षा ती जाते म्हणतेय तीला आपलं जीवन जगु द्या. मग बाबा म्हणाले ठिक आहे.

गुजराथी परिवाराने आपली लेक मानली

मुंबईत त्यांच्या ओळखीचे काही लोकं होते. दादरला रेल्व क्वार्टरस्‌ आहेत दादर ब्रीजच्या खाली. मग बाबांनी त्यांच्या ओळखीच्या एका गुजराथी परिवाराला मला ठेऊन घेण्याची विनंती केली. गुजराथी परिवाराने पण आमच्या जश्या ३ मुली तशी ४ थी हिला समजुन ठेऊन घेऊ असी तयारी दाखवली.

सनमिलमध्ये आधी हेल्पर मग कारागीर

लोअर परेलला सनमिल कंम्पाऊंड होतं तीथे एक होजिअरीची कंपनी होती. तीथे कामाला लागले. माझ्या मनात भिती होती. मशिन मला नीट चालवता येतच नव्हती, म्हणून त्यांनी मला हेल्पर म्हणून काम दिले. २ रुपये रोजगार रोजचा म्हणजे महिन्याला ६० रुपये मिळत होते. तेव्हा मला माझाच राग येत होता, कि मी चांगली कारागीर आहे पण मशिन का चालवता येत नाही. जेवणाच्या वेळेत मशिन मोकळी असातांना मी हळुच मशिनवर बसायचे, ८ दिवसाच्या सरावात मला मशिन चालवता येऊ लागलं. सरावानं भितीही मेली. मग मी त्यांना सांगीतले मी कारीगर आहे मला कपडे शिवायला द्या. दुस-या महिन्यापासुन त्यांनी मला कारीगर म्हणून मशिनवर काम दिलं. दुस-या महिन्यात मी 200-रुपये कमावले.

गुजराथी परिवाराची मानुसकी

माझ्या जीवनात पहिल्यादा १०० रुपये कसे असतात ते पाहिले. ते पैसे घेऊन मी जिथे रहात होते तीथे गेले, त्यांना माझी ही पहिली कमाई तुम्ही घ्या असे म्हणाले. ते गुजराथी लोक इतके चांगले होते. मी ते मला म्हणाले आम्ही मुलींना देत असतो, घेत नसतो. हे पैसे तुझे आहेत.तुझ्याच कडे ठेव. मी त्यांना म्हणाले मी खाते व राहते तुमच्याकडे,त्यांचे तरी पैसे घ्या. त्यांनी घ्यायला नकार दिला. बेटा ते तुझेच आहेत.तुझ्याचकडे पैसे ठेव. मी जबरदस्ती त्यांना दिले. पण त्यांनी नकळत माझी त्या काळी पत्र्याची पेटी होती.त्यात टाकुन दिले.

संकटं परिक्षा घेण्यासाठीच येतात

दिड दोन वर्ष गेले. माझ्या बाबांची नोकरी गेली. संपुर्ण परिवार उघडयावर पडला. माझे आजोबा हे शेतामध्ये काम करणारे मजुर होते. मदतीसाठी ते मामाकडे गेले.मामांची परिस्थीती थोडी चांगली होती. पण त्यांनी मदतीच्या बदल्यात माझ्या घरच्यांकडुन गुरं चारायला लावण्यासारखी कामं करुन घेतली. बाबा पोलिसात होते,स्वाभीमानी होते खुप मान होते. त्यांच्या मनाला या गोष्टी खुप लागल्या,ते आजारी पडले.

जीवनातला योग्य निर्णय

मग मी ठरऊन सर्वांना मुंबईला बोलावले. इथे घर घेणं शक्य नव्हतं. कल्याणला ४०० रुपये डिपॉझिट व ४ रुपये भाड्याचं घर चाळीत घेतलं. आम्ही ठरवलं होतं हेच आता आपलं जीवन.यापेक्षा जास्त काही शक्य नाही.

पैसे कमावलेच पाहिजेत

पण झालं असं की माझी एक बहिण होती.ती आजारी झाली खुप. तीच्या उपचारासाठी पैसे नव्हते, कारण पोटचं भरणं कठीण होतं. नाईलाजाने मी मरत होती. मरतांना ती म्हणत होती ताई मला मरायचं नाही,मला वाचव. तीच्या डोळ्यातली ती भावना मला आजही दिसते. मला खुप वेदना झाल्या, आपण आपल्या बहीनीला वाचऊही शकतो नाही हे मनाला लागलं. आपल्या डोळ्यादेखत आपलं जवळचं कोणी मरतयं. आपण फक्त पैसा नसल्यानं काहीच करु शकतं नाही. तेंव्हा मी ठरवलं की पैसा हा जीवनात खुप महत्वाचा आहे. पैसा कमावला पाहिजे. कुटुंबातल्या कोणालाही कधीही काहीही होऊ शकते. बाबांना काही होऊ शकते. माझ्याकडे पैसा नसेल म्हणून डोळयासमोर सगळे जातील. त्यापेक्षा आपण पैसे कमाऊ या. पण प्रश्न पडला पैसे कमवायचे म्हणजे कसे कमावणार.

शोधा म्हणजे सापडेल

मी रेडीओवर शासनाच्या बेरोजगारांसाठीच्या एका योजनेबध्दल ऐकले. ऐकलं होतं पण करायचं कसं हेच माहित नव्हते. कोणाला याची माहिती असेल, कोण यासाठी आपल्याला मदत करु शकते. एक ग्रहस्थ होते त्यांनी मला महात्मा जोतिबा फुले महामंडळाकडे घेऊन गेला. इथे तुमच्या समाजाची जी लोकं आहेत त्यांना इथे लोन मिळु शकते. मग तीथे कागदपत्र, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, काय करणार त्याचा प्रस्ताव, कोटेशन आदी करण्यासाठी बराच वेळ गेला. कारण हे पहिल्यांदाच करत होते. माहितच नव्हते. इथे पहिल्यांदा मला ५० हजाराचे लोन मिळाले. मी ठरवलं होतं कि एक दुकान भाड्यानं घेईन ३-४ मशिन ठेऊन बुटीकचे दुकान सुरु करेन. कारण तीच एक कला मला जमत होती.

फर्निचरचा व्यवसाय

उल्हासनगरला फर्निचरचा व्यवसाय खुप चांगल्यापैकी चालतो. मध्यमवर्गीय लोकांना परवडणारे फर्निचर तीथे मिळते. गोजरेजची कपाटं ७-८ हजाराला असायची ती महाग होती. पण उल्हासनगरची निम्या किंमतीत मिळायची. मी ठरवलं की शिवत बसुन कमाई होईल त्यापेक्षा जास्त कमावण्याची संधी फर्निचरच्या व्यवसायात आहे. म्हणून मी फर्निचरचा व्यवसाय सुरु केला.

सुशिक्षीत बेरोजगार संघटना

मला जाणिव झाली जशी मी आहे तशाच अनेक जणी असतील. सर्वांनाच सरकार काही नोक-या देऊ शकत नाही. त्यांचे प्रश्न कसे सुटतील. त्यांनाही माझ्यासारखंच लोन मिळालं तर तेही आपल्या पायावर उभे राहु शकतील. आपण एक संघटना तयार करु असे ठरऊन सुशिक्षीत बेरोजगार संघटना सुरु केली. या संघटनेच्या कार्यक्रमात सरकारी अधिकारी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, बॅकेचे अधिकारी, योजनांचे अधिकारी, पोलिसचे कमिशनर व अधिकारी अशा लोकांना मार्गदर्शनासाठी पाहुणे म्हणून बोलावत असु. त्यांचे गेटटुगेदर करत असु. योजनेचे अधिकारी योजना समजाऊन सांगायचे. व्यवसाय कसा केला पाहिजे. शासनाचे सहकार्य कसे घेता येईल. बॅकेचे अधिकारीही बॅकेचे लोन कसे मिळवता येईल याचे मार्गदर्शन करायचे. त्याच कार्यक्रमात अनेक गरजु युवक तिथल्या तिथेच फॉर्म भरायचे. व कर्जही लवकरात लवकर मंजुर व्हायचे. अनेकांनी याव्दारे कर्ज घेऊन व्यवसाय सुरु केला. पैकी काहींना नोकरीच करायची त्यांना पोलिस व इतर विभाग आणि खाजगी ठिकाणी नोकरीला लावलं. असी ही कामं झाल्यानं लोकांच्या चूली पेटल्या. माझ्याबध्दल एक चांगली भावना लोकांत निर्माण झाली. ही जी महिला आहे ती चांगले काम करते. मुलं बिघडण्याची भिती होती. ती या संघटनेच्या कार्यानं घडली.

मग लोकांचे काहीही प्रश्न असले की माझ्याकडे यायला लागले. ते सोडवण्याचेही काम मी करतच होते. माझं व्यवसाय व सामाजिक कामं दोन्हीही सुरु होते.

भारतीय महिला बॅकेच्या संचालिका

भारत सरकारनं मागे असा निर्णय घेतला की भारतीय महिला बॅक ही स्टेट बॅक ऑफ इंडियामध्ये विलिन करायची. व देश पातळीवर तीचा विस्तार करावा. व केवळ महिलांकरीता असलेली बॅक ही देशभर असावी. महिलांमध्ये याचा एक वेगळा संदेश जातो. महिला तीथे जाईल खाते उघडेल,पैसे भरेल व काढेल, कर्ज घेईल-परत करेल, आपले आर्थिक प्रश्न मांडेल व सोडऊन घेईल. ब-याच महिलांना पुरुष बॅकेच्या अधिका-या समोर बोलता येत नाही.लाजतात-घाबरतात. त्याऐवजी महिलाच असेल तर स्पष्टपणे सांगु शकतात. आशा आहे सरकार यासाठी पुढाकार घेईल.

जातिय संघर्ष व तेढ

आधी जातिय संघर्ष व तेढ नव्हती, ती जाणिवपूर्वक निर्माण केली जातेय. कायदा चांगला असावा व त्याची अंमलबजावणीही तितकीच चांगली असावी.

लेखन- लक्ष्मीकान्त माळवदकर, स्वयम्‌ शिक्षण प्रयोग (9423774727)