“ २० हजार पेक्षा जास्त महिला शेतकरी शाश्वत शेतीचा पुरस्कार करतात ”

स्वयं शिक्षण प्रयोग च्या कार्यक्षेत्रातील यशस्वी शेतकरी महिला नेतृत्वाचा गौरव

कार्यक्रमात पुरस्कृत महिलांनी आपले विचार व अनुभव मांडतांना आता आम्ही आमच्यासाठीच नाही तर समाजातील महिला व सर्वांची सोबत घेऊन कसे पुढे जात आहोत हे सांगीतले. सेंद्रीय, नैसर्गीक शेती व पुरक व्यवसायामुळे अन्न सुरक्षा तर होतेच सोबतीला जास्तीचा सेंद्रीय माल विकुन उत्पन्न सुरक्षाही मिळते. अनेकींनी आपले उत्पन्न कसे ५ ते १० पट झाले तेही सांगीतले.

स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून शाश्वत शेतीचे यशस्वी उदाहरण समाजासमोर ठेऊन २० हजार पेक्षा जास्त महिला शेतक-यांना प्रवृत्त करणाऱ्या शेतकरी महिलांचा यशदा,पुणे येथे दिनाक १२ ऑक्टोबर २०१७ रोजी डॉ.अऱविंद चिंचुरे, सिम्बियोसीस, पुणे, डॉ.प्रकाश वडगावकर, एनसीएल, डॉ.अमरेंद्र साहु, साईबालाजी ग्रुप ऑफ इंस्टिट्युट,पुणे, श्री.अभिनंदन थोरात,चेतना ग्रुप, श्री. शरद महाजन, मशाल, श्रीमती नित्या गुटे यांच्या हस्ते स्वयम्‌ शिक्षण प्रयोगच्यावतीने “सखी रत्न” पुरस्कार देऊन १८ महिला शेतक-यांना पुरस्कृत करण्यात आले.

शाश्वत शेती, अन्न व उत्पन्न सुरक्षेव्दारे शेतकरी महिलांचे सशक्तीकरण करण्याच्या स्वयं शिक्षण प्रयोगच्या उपक्रमाला संयुक्त राष्ट्र महासभेच्या सोहळ्या दरम्यान यु एन डी पी ने पुरस्कृत केले. याचा आनंद सोहळा आज सर्व महिलांनी यशदा,पुणे येथे साजरा केला. यावेळी आपले अनुभव सादर केले.

या कार्यक्रमासाठी उस्मानाबाद, लातूर, सोलापुर, नांदेड, वाशीम व पुणे येथून नेतृत्व करणाऱ्या ८० महिला सहभागी झाल्या.

“ग्रामीण महिलांचा हा शाश्वत शेतीचा हा उपक्रम भविष्याची गरज आहे. ज्यात अन्न व उत्पन्न सुरक्षा आहे. शिवाय पर्यावरणाबाबत जिम्मेदारीचे पालनही आहे. हे कार्य पुढच्या काळात जास्त यश मिळऊन देईल” असे प्रोफेसर डॉ.अरविंद चिंचुरे, सिंम्बियोसीस,पुणे यांनी विषद केले.

कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना डॉ.प्रकाश वडगावकर यांनी “स्वयं शिक्षण प्रयोगच्या महिला सक्षमीकरण उपक्रमाला एनसीएलचा एक वैज्ञानिकच म्हणून नाही तर एक जबाबदार स्थानिक म्हणून तंत्राची व ज्ञानाची काहीही मदत करण्यास तयार असल्याचे सांगीतले.

 डॉ.अमरेंद्र साहु यांनी महिला व त्यांचे अनुभव खरेच प्रेरणादायी असल्याचे सांगीतले. माझ्या रिजर्व बॅक,नाबार्ड व पत पुरवठा संदर्भात असलेल्या ज्ञान व अनुभवाची कधीही गरज भासल्यास सदैव सहकार्यासाठी तयार असल्याचे सांगीतले. शिवाय महिलांनी बॅका व शासनाच्या कर्जाचा आधार घेऊन प्रगती साधावी” असे प्रतिपादन केले.

“पुढच्या काळात या महिलांनी अन्न व उत्पन्न सुरक्षेच्या या शाश्वत शेतीचा उपक्रमाचा अधिकाधीक प्रसार-प्रचार करण्याचे नियोजन केले आहे. संस्था म्हणून कार्य करतांना मर्यादा येतात, पण जर शासनाची साथ मिळाली तर कमी कालावधीत जास्तीचे कार्य अधिक यशस्वी होऊ शकते. शासनाच्या सहकार्यातून वातावरण व व्यवस्था निर्मिती, योग्य कालावधीचे व व्याजाचे कर्ज आणि महिला उत्पादीत वस्तु व सेवांना बाजारपेठेत योग्य व मोठ्या प्रमाणात स्थान देता येईल.” स्वयम्‌  शिक्षण प्रयोगच्या संस्थपक व कार्यकारी संचालिका, श्रीमती प्रेमा गोपालन यांनी विदित केले.

याकार्यक्रमास आयटीसी, यार्डी, युवा,मुंबई, मानदेशी, देआसरा,टाईड टेक्नोक्रॅट सह अनेक प्रतिनिधी उपस्थित होते.